केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांच्यात विजेतेपदासाठी लढत

पुणे, दि.17 नोव्हेंबर 2017- एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या तर्फे आयोजित चौथ्या 50000डॉलर +हॉस्पिटॅलिटी  केपीआयटी एमएसएलटीए एटीपी चॅलेंजर स्पर्धेत एकेरीत भारताच्या युकी भांब्री व रामकुमार रामनाथन यांनी अनुक्रमे स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज-मॅसिरास व भारताच्या साकेत मायनेनी यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.   

एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत  एकेरीत पहिल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जागतिक क्रमवारीत 137व्या क्रमांकावर असलेल्या भारताच्या युकी भांब्री याने आपली विजयी मालिका कायम ठेवत जागतिक क्र.127 असलेल्या स्पेनच्या ऍड्रियन मेनेनडेज-मॅसिरास याचा 6-2, 6-4 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 39मिनिटे चालला. 25वर्षीय युकीने सामन्याच्या सुरुवातीपासूनच ऍड्रियनवर आपले वर्चस्व कायम राखले. चौथ्या गेमपर्यंत दोन्ही खेळाडूंनी आपापल्या सर्व्हिस रोखल्या व सामन्यात 2-2 अशी स्थिती निर्माण झाली. पाचव्या गेममध्ये ऍड्रियन याने डबल फॉल्ट केला व याचाच फायदा घेत युकीने दोन ब्रेकपॉइंट घेत त्याची सर्व्हिस ब्रेक केली व सामन्यात 3-2अशी आघाडी घेतली. त्यांनंतर युकीने बॅकहँड व फोरहँडचा सुरेख वापर करत सातव्या गेममध्ये ऍड्रियनची सर्व्हिस पुन्हा भेदली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकून अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकले. दुसऱ्या सेटमध्ये 2-2 अशी सामन्यात बरोबरी असताना युकीने पाचव्या गेममध्ये ऍड्रियन याने डबल फॉल्ट केला व मिळालेल्या संधीचे सोने करत दोन ब्रेकपॉइंट मिळवत सर्व्हिस ब्रेक केली व 3-2अशा फरकाने आघाडी घेतली. 9व्या गेममध्ये 40-30अशा आघाडीसह युकीने  मॅचपॉईंट मिळवला होता. पण ऍड्रियनने मात्र कडवी झुंज देत आपली सर्व्हिस राखत हा गेम जिंकून आपले आव्हान कायम राखले. 10व्या गेममध्ये युकीने बिनतोड सर्व्हिस करत हा सेट 6-4असा जिंकून अंतिम फेरी गाठली.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात भारताच्या जागतिक क्र. 150 असलेल्या  रामकुमार रामनाथन याने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या भारताच्या साकेत मायनेनीचा 6-3, 6-2 असा सरळ सेटमध्ये पराभव करून अंतिम फेरी गाठली. पहिल्या सेटमध्ये रामकुमार याने जिगरबाज खेळाचे प्रदर्शन करत दुसऱ्या गेममध्ये सर्व्हिस रोखली व 2-0 अशी आघाडी मिळवली. सामन्यात पिछाडीवर असलेल्या साकेतला शेवटपर्यंत बरोबरी साधत आली नाही.  या सेटमध्ये 9व्या गेममध्ये रामकुमार याने स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-3 असा जिंकला. दुसऱ्या सेटमध्येदेखील रामकुमार याने आपला खेळ उंचावत पाचव्या, सातव्या गेममध्ये साकेतची सर्व्हिस रोखली व स्वतःची सर्व्हिस राखत हा सेट 6-2 असा जिंकून अंतिम फेरीत प्रवेश केला.   

 

स्पर्धेचा सविस्तर निकाल-एकेरी गट- उपांत्य फेरी

युकी भांब्री(भारत,3) वि.वि.ऍड्रियन मेनेनडेज मॅसिरास(स्पेन,2)6-2, 6-4;

रामकुमार रामनाथन(भारत,4) वि.वि.साकेत मायनेनी(भारत)6-3, 6-2. 

Share Now

Related Post